अवकाश नकाशा कसा पहावा?

अवकाश नकाशा कसा पहावा?

नकाशा म्हणजे एखाद्या ठराविक जागेचा विस्तृत आराखडा. नकाश्याद्वारे आपणास त्या ठराविक जागेमध्ये एखादी गोष्ट कोठे आहे हे व्यवस्थित कळते.

जगाच्या नकाश्यामध्ये पृथ्वीवर असलेल्या अनेक देशांचा आराखडा आपणास कळतो. या आराखड्यामध्ये पृथ्वीवरील जमिनीची विभागणी करून ठराविक जमिनीचा भाग कोणत्या देशामध्ये येतो ते कळते. कोणत्याही गोष्टीची विभागणी केल्यास ती गोष्ट अधिक सुस्पष्टरीत्या कळते.

जगाच्या नकाश्यामध्ये चार बाणांद्वारे दिशा सांगितलेली असते. साहजिकच जर आपण नकाशा पाहत असाल तर नकाश्यामध्ये वरील बाण जर ‘उत्तर दिशा’ दाखवीत असेल तर उजव्या बाजूचा बाण ‘पूर्व दिशा’, डाव्या बाजूचा बाण ‘पश्चिम दिशा’ व खाली दर्शविलेला बाण ‘दक्षिण दिशा’ दर्शवित असतो.

अशा प्रकारे बहुतेक नकाश्यामध्ये चार बाणांद्वारे दिशा दर्शविली जाते. ज्यामध्ये वरील बाण ‘उत्तर दिशा’ दर्शवितो.

अवकाश नकाश्यांमध्ये देखिल अशा प्रकारेच चार बाणांद्वारे दिशा दर्शविलेली असते. परंतु काही वेळा अवकाश नकाश्यांमध्ये वरील बाणाने ‘दक्षिण दिशा’ व खालील बाणाने ‘उत्तर दिशा’ दर्शविलेली असते. अशावेळेस आपण यास छपाई करतानाची चूक समजतो. परंतु ही चूक नसून त्यांनी तसेच छापलेले असते. तसे छापण्यामागे त्यांचा दृष्टिकोन निराळा असतो.

पृथ्वीवरील जमिनीचा नकाशा आपण टेबलावर ठेवून पाहतो. परंतु अशा प्रकारे अवकाश नकाशा खाली ठेवून वर आकाशात पाहण्यात वर-खाली पाहिल्याने काही वेळेस त्रास होतो म्हणून काही ठराविक अवकाश नकाशे खास करून वर आकाशाकडेच पाहून अवकाश निरीक्षण करण्यासाठी बनवलेले असतात.

समजा आपण उत्तरेकडे तोंड करून हातामध्ये अवकाश नकाशा घेऊन उभे आहात. या नकाश्यामध्ये दाखविलेल्या चार बाणांपैकी वरील बाणावर ‘दक्षिण दिशा’ व खालील बाणावर ‘उत्तर दिशा’ असे लिहिले आहे. आता उत्तर दिशेकडे तोंड करूनच हातामध्ये असलेला नकाशा वर-वर करीत अवकाशाच्या दिशेस हळूहळू न्या. आता आपल्या लक्षात येईल की आपले तोंड उत्तर दिशेस आहे व अवकाशाच्या दिशेने हातामध्ये धरलेल्या नकाश्यामधील वरील बाण बरोबर ‘दक्षिण दिशा’ व खालील बाण बरोबर ‘उत्तर दिशा’ दर्शवित आहे. तसेच उजवी कडील बाण ‘पूर्व दिशा’ व डावीकडील बाण ‘पश्चिम दिशा’ दर्शवित असेल.

अशाप्रकारे काही अवकाश नकाशे खास करून अवकाशाच्या दिशेनेच धरून निरीक्षण करण्याच्या दृष्टीने बनविलेले असतात. ज्यामध्ये दिशा दर्शविणार्‍या बाणांपैकी वरील बाण ‘दक्षिण दिशा’ दर्शवित असतो.